४) रामदासांनी लिहिलेल्या कोणत्याही ग्रंथात 'मी शिवरायांचा गुरु आहे ' किंवा ' शिवराय माझे शिष्य आहेत' असे प्रत्यक्षपणे देखील म्हटलेले नाही. छ. शिवरायांच्या समकालीन बखरीत किंवा ग्रंथात छ. शिवराय व रामदास यांच्या गुरु- शिष्यत्वाचा उल्लेख नाही. इतकेच काय छ. शिवराय व रामदासांच्या भेटीचाही उल्लेख नाही. सभासदांची बखर , ९१ कलमी बखर, स्वानुभव दिनकर, शिवभारत, जेधे शकावली अशा १७ व्या शतकातील समकालीन अनेक ग्रंथात वरील प्रकारचा उल्लेख नाही. परंतु छ. शिवराय व रामदासांचा संबंध १८ व्या शतकाच्या शेवटी (१७९०) हनुमान स्वामीच्या बखरीत चीटनिसांनी प्रथम केला. मग रामादासभक्तानी अशा अनेक कथा रचून छ. शिवरायांचे गुरु रामदास म्हणून सांगण्यास सुरवात केली. या पार्श्वभूमीवर म. फुलेंनी प्रथम खऱ्या इतिहासाची मांडणी केली. नंतर कृ.अ.केलुस्कारांनी शास्त्रीय चिकित्सा करून छ. शिवरायांचे ऐतिहासिक चरित्र लिहिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत १९०२ साली इतिहासाचार्य म्हटल्या जाणाऱ्या वी. का. राजवाड्यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे 'राष्ट्रगुरू रामदास ' हा लेख 'ग्रंथ माला' मासिकात लिहिला. मग या विचारला मोठीच चालना मिळाली.
राजवाड्यांनी पुढे केलेले सर्व पुरावे निराधार आहेत, असे पुढे संत साहित्याचे अभ्यासक म.व.धोंडांनी सिद्ध केले. जुलै १९२९ च्या विविधज्ञानविस्तार या अंकात न.रा.फाटकांनी ' रामदास आणि शिवाजी' हा दीर्घ लेख लिहून वी.का.राजवाड्यांना चोख उत्तर दिले. पुढे शेजवलकर, व.सी.बेंद्रे., अप्पासाहेब पवार आदी अनेक इतिहास अभ्यासकांनी रामदासांना छ. शिवरायांचे गुरु ठरवण्याचे कारस्थान मोडून काढले.
'रामदासांचे लेखन व शिवरायांचे कार्य यांचे कोणतेच नाते नाही. मग गुरु-शिष्याचा संबंध कसा जोडायचा ?' असा प्रश्न म.व. धोंडांनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment